विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

पुणे : औंध-बोपोडी परिसरातील शाळांजवळील चौक अधिक सुरक्षित, सुबक आणि वाहतूकस्नेही करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी महापालिकेच्या पथ विभागाकडे निवेदन सादर केले आहे. प्रभाग क्रमांक ८-डी अंतर्गत गणेशखिंड रोड परिसरातील विविध शाळांजवळील चौकांचे वाहतूकदृष्ट्या नियोजनबद्ध विकासकाम करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुख्य अभियंता, पथ विभाग यांना दिलेल्या निवेदनात निम्हण यांनी नमूद केले आहे की, केंद्रीय विद्यालय, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल आणि स्पायसर स्कूल यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्था मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत आहेत. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांसह पालकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतुकीवर ताण निर्माण होतो. परिणामी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अनेकदा धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित चौकांमध्ये ‘स्कूल झोन’ दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर, दिशादर्शक चिन्हे तसेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शाळा परिसरात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देणारी आणि जनजागृती करणारी आकर्षक भिंतीचित्रे (वॉल पेंटिंग) रंगविण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

तसेच विद्यार्थी, पालक आणि वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपर फलक आणि बॅनर्स लावण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भिंतीचित्रांचा दर्जा उच्च प्रतीचा राहावा आणि त्याचा विद्यार्थ्यांवर प्रभावी परिणाम व्हावा यासाठी हे काम फाईन आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट क्षेत्रातील प्रशिक्षित तज्ज्ञ अथवा संस्थांकडून करून घेण्याची सूचनाही निम्हण यांनी केली आहे.

याबाबत बोलताना नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. औंध-बोपोडी परिसरातील हजारो विद्यार्थी दररोज या मार्गांचा वापर करतात. त्यामुळे संबंधित चौकांचे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि आधुनिक पद्धतीने रूपांतर करणे ही काळाची गरज आहे. पुणे महानगरपालिकेने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी.”

दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन आणि शाळा परिसर अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Scroll to Top