पुणे, दि. ४ : प्रतिनिधी
कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट विनायक निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सोमेश्वर फाऊंडेशन’च्यावतीने पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘विनायक विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपाचा हा समारोह दि. ५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन
नावनोंदणी करावी, अशी माहिती सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला सनी विनायक निम्हण यांच्यासह उमेश वाघ, बिपीन मोदी, येवल्याचे नगराध्यक्ष निलेश पटेल, वेदांत बांदल हे उपस्थित होते. सनी निम्हण पुढे म्हणाले की, ” जगात कोणीही शिक्षण आणि आरोग्यापासून वंचित राहू नये,” असे नेहमीच कार्यसम्राट विनायक निम्हण म्हणायचे. विशेष म्हणजे पाचवी आणि आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थोड्या गुणांनी हुकलेली आहे. त्यांनादेखील प्रोत्साहनपर या उपक्रमात शिष्यवृत्ती दिली जाईल.
ते पुढे म्हणाले की, “यासाठी दि. ७ जुलै ते दि. २० जुलै रोजीदरम्यान ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची दि. २६ जुलै व दि. २७ जुलै रोजी ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना दि. ५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. अधिक माहितीसाठी ८३०८१२३५५५ या क्रमांकावर किंवा www.sunnynimhan.com वेबसाईटवर संपर्क साधावा,” असे आवाहन यावेळी सनी निम्हण यांनी केले.
पुण्यात शिकणाऱ्यांना मिळणार विनायकी – विनायक निम्हण शिष्यवृत्ती
