PMC Election 2026 : पुणे शहराच्या विकासाला भाजपच पर्याय – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहरांच्या पंक्तीत नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रचाराच्या शुभारंभी भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष असून निवडणूक असो वा नसो, भाजपचे कार्यकर्ते वर्षभर जनतेसाठी काम करत असतात. “निवडणूक नसली तरी भाजपचा कार्यकर्ता २४ तास सक्रिय असतो. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था इतकी कमकुवत झाली आहे की त्यांना उमेदवारही मिळत नाहीत आणि बाहेरून उमेदवार आणावे लागत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

पुण्याचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशी सुसंगत असलेल्या धोरणांमधूनच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्हाला केवळ सत्ता नको, तर जनतेची सेवा करायची आहे,” असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या युतीतून सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड आणि सपना आनंद छाजेड हे चार उमेदवार प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवत असल्याची माहिती देण्यात आली.

मोहोळ यांनी गेल्या पाच वर्षांत पुणे महापालिकेत भाजपने केलेल्या कामांचा उल्लेख करत शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. तसेच केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या कामगिरीचा दाखला देत,
“आज जवळपास प्रत्येक घरात शासनाच्या योजनांचा लाभार्थी आढळतो,” असे ते म्हणाले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, केंद्र आणि राज्यात ‘डबल इंजिन सरकार’ असताना, पुण्यात भाजपला बहुमत दिल्यास ‘ट्रिपल इंजिन सरकार’ तयार होईल आणि त्यामुळे शहराचा विकास वेगाने होईल.

यावेळी बोलताना भाजप उमेदवार सनी निम्हण यांनी सांगितले की, स्वर्गीय मंत्री चंद्रकांत छाजेड आणि स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रभागाचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास करण्यावर भर दिला जाईल. बोपोडी परिसरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी दोन महापालिका दवाखान्यांचे सक्षमीकरण, तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासाठी ई-लर्निंग शाळा सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

उमेदवार भक्ती अजित गायकवाड यांनी सांगितले की, विद्यमान नागरी सुविधा अधिक सक्षम करताना, महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून प्रलंबित स्थानिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल. पारदर्शक कारभार आणि नागरिकांचा सहभाग हे विकासाचे महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“विकास हा व्यवहार्य आणि लोककेंद्री असला पाहिजे. आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन नागरी सुविधांचा लाभ प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे गायकवाड म्हणाल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top