पुणे : औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील मतदारांनी भरभरून प्रेम आणि विश्वास दाखवत चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांना महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून दिला आहे. एकूण मतदानांपैकी तब्बल ५१ टक्के मते आपल्या पारड्यात पाडत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना सनी निम्हण म्हणाले, “मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. हे यश माझे वैयक्तिक नसून, विकासाला मिळालेले मत आहे. हे यश आनंद देणारे असले तरी जबाबदारी वाढवणारे आहे.”
ते पुढे म्हणाले की, औंध–बोपोडी ८ प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील १०० दिवसांचा ठोस रोडमॅप तयार असून, त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून केली जाईल, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
या विजयामागे माजी कार्यसम्राट आमदार स्वर्गीय विनायक निम्हण आबा यांची पुण्याई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिलेले खंबीर पाठबळ, भाजपचे असंख्य कार्यकर्ते तसेच आबा प्रेमींची साथ कारणीभूत ठरल्याचे सनी निम्हण यांनी नमूद केले.
औंध–बोपोडी परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांवर विशेष भर दिला जाईल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
