शेतकऱ्यांसाठी सनी निम्हण सरसावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली 5,55,555 लाखांची मदत

पुणे : मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिके वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आणि ‘सनीज फूड्स’ यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त व मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सुपूर्त केला.

‘सोमेश्वर फाउंडेशन’ आणि ‘सनीज फूड्स’ यांच्या वतीने दरवर्षी सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. हजारो नागरिक हा फराळ विकत घेतात आणि “ना नफा, ना तोटा” या तत्वावर जनसामान्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्याचे भाग्य निम्हण परिवाराला लाभते.

या फराळ विक्रीतून जमा झालेल्या रकमेतील काही हिस्सा मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा संकल्प निम्हण परिवाराने केला होता. या आवाहनाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरला. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सनी विनायक निम्हण यांनी धनादेश सुपूर्त केला. या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून कौतुक केले आणि ‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top